कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यानंतर मंगळवारी रात्री डोंबिवलीत मोठी राजकीय खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक २९ मधील भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संतप्त शिवसैनिकांनी शास्त्रीनगर रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला असून कल्याण-डोंबिवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.
मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेतले. अटकेच्या प्रक्रियेदरम्यान दोघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा डोंबिवली(Dombivli) च्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात उमेदवारांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तुकाराम नगर आणि रुग्णालय परिसरात जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर अटक झाल्याने हे दोन्ही उमेदवार स्वतःचे मतदान करू शकणार का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “आमच्या उमेदवारांची प्रकृती स्थिर नसतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही सरळ सरळ दडपशाही असून प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. जर उमेदवारांच्या जिवाला काही झाले, तर त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार असतील,” असा इशारा आमदार मोरे यांनी दिला आहे.




