मतदानाच्या दिवशी प्रचाराला मुभा, नव्या मशीनवर गोपनीयता सरकारच्या फायद्यासाठी नियम बदलल्याचा मनसेचा आरोप
महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून गुरुवारी, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अलीकडील निर्णयांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदारांना घरोघरी भेटण्यास परवानगी देणाऱ्या नियमावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत निवडणूक प्रचार ठराविक वेळेला संपल्यानंतर पुढचा दिवस पूर्णपणे शांततेचा असायचा आणि त्यानंतर मतदान व्हायचे. मात्र, अचानक हा जुना संकेत मोडीत काढून नवा नियम कसा काय लागू करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हा बदल फक्त याच निवडणुकीसाठी का? विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत अशी मुभा का नव्हती?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.
मतदानाच्या दिवशी पत्रके वाटण्यास बंदी असताना, प्रत्यक्ष भेटींच्या नावाखाली गैरप्रकारांना वाव दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी थेट पैसे वाटपाकडे सूचक इशारा केला. भाजप आणि शिंदे गटाकडून पॅम्प्लेटमध्ये पैसे ठेवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून, अनेक मतदार ते नाकारत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, ईव्हीएमसोबत वापरात आणलेल्या नव्या ‘प्रिंटिंग ऑक्झिलरी युनिट’बाबतही राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला. ही यंत्रणा कोणत्याही राजकीय पक्षाला प्रत्यक्ष दाखवण्यात आली नसल्याचा आरोप करत, पारदर्शकतेचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. “नवीन मशीन कशी दिसते, ती कशी काम करते, हेच माहीत नाही. आधी बुथवर सर्व पक्षांसमोर चाचणी घेतली जायची, आता ती पद्धतच नाहीशी झाली आहे,” असे ते म्हणाले.
सरकारच्या गरजेनुसार कायदे आणि नियम बदलले जात असून निवडणूक आयोग सरकारच्या बाजूने काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. शेवटी, शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, सुरू असलेल्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.




