spot_img

 Rashmi Desai : “आठ वर्षे नैराश्याशी झुंज दिली” रश्मी देसाईचा भावनिक खुलासा

spot_img

टीव्हीवर यशस्वी कारकीर्द, पण खऱ्या आयुष्यात मानसिक संघर्ष; कामच ठरलं आधार

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई हिने अनेक गाजलेल्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत राहिली. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मीने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि संवेदनशील टप्प्याबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे.

एका मुलाखतीत रश्मीने सांगितलं की, ती जवळपास आठ वर्षे नैराश्याशी झुंज देत होती. सततच्या भावनिक ताणामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम झाला होता. यशस्वी अभिनय कारकीर्द असूनही आतून ती एकटेपणाशी आणि अस्थिरतेशी झगडत होती, हे ऐकून अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

रश्मी म्हणाली, “एक दीर्घ काळ असा होता, जेव्हा मला स्वतःला सावरणं खूप अवघड गेलं. भावनिक दबाव इतका होता की त्यातून बाहेर पडायला अनेक वर्षे लागली. आयुष्य पुन्हा नीट मार्गावर आणण्यासाठी मला स्वतःवर काम करावं लागलं. आता मी हळूहळू स्थिर होत आहे.”

तिने पुढे स्पष्ट केलं की, मानसिक शांतता मिळवण्यासाठी कामच तिचा आधार ठरलं. काम करताना तिला स्वतःला व्यक्त करता येतं आणि त्यातूनच तिला ऊर्जा मिळते, हे तिला उशिरा कळालं. सध्या ती काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करत असून मानसिक आरोग्याला अधिक महत्त्व देत आहे.

रश्मीने हेही मान्य केलं की सेटवरचं वातावरण तिच्यासाठी एक सुरक्षित जागा बनलं आहे, जिथे ती तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकते. आता ती केवळ करिअरवरच नाही, तर स्वतःच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावरही लक्ष देत असल्याचं तिने सांगितलं. टीव्ही मालिकांबरोबरच रश्मीने ‘खतरों के खिलाडी 6’, ‘नच बलिए 7’ आणि ‘झलक दिखला जा 7’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे.

दरम्यान, याआधी एका अन्य मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतील सुरुवातीच्या काळात आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दलही सांगितलं होतं. अवघ्या 16 व्या वर्षी कास्टिंग काऊचचा सामना केल्याचा खुलासा तिने केला होता. एका ऑडिशनच्या नावाखाली आपल्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत तिने त्या प्रसंगातून कसाबसा बचाव केल्याची आठवण शेअर केली होती. रश्मीचा हा खुलासा केवळ तिच्या चाहत्यांसाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ