धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. रणवीर सिंहच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची देशभरात किंबहुना परदेशातही तेवढीच हवा झाली. विशेष म्हणजे अक्षय खन्नाचा डान्सिंग स्टाईलवर आणि FA9La या गाण्यावर जवळपास सगळेच थिरकले. बहरानी भाषेत असलेलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की प्रेक्षकांना अजूनही या गाण्याची क्रेझ गेलेली नाही. या गाण्यावर अभिनेता अक्षय खन्नाने साकारलेला डान्स सोशल मीडियावर ट्रेंड बनला. आता या गाण्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. FA9LA गाण्याचा गायक आणि बहरीनचा प्रसिद्ध रॅपर फ्लिपराची भारत दौऱ्यावर येत आहे.
रॅपर फ्लिपराचीचा इंडिया टूर अधिकृतपणे सुरू झाला असून, त्याच्या पहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी बेंगळुरूची निवड करण्यात आली आहे. ‘धुरंधर’मधील गाण्यामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाल्यानंतर फ्लिपराची पहिल्यांदाच भारतात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. त्याचा पहिला शो 14 मार्च 2026 रोजी होणार आहे. फ्लिपराचीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारत दौऱ्याची माहिती दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,“भारतामधील पहिल्या शोची तारीख जाहीर! 14 मार्च रोजी बेंगळुरूमध्ये @un40fam येथे परफॉर्म करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. लवकरच आणखी तारखा जाहीर केल्या जातील. आम्ही पुढे कोणत्या शहरात परफॉर्म करायला हवा? कमेंटमध्ये तुमच्या शहराचं नाव लिहा.”




