मराठी अस्मितेचा हुंकार, मोदी–फडणवीसांवर कडाडले उद्धव ठाकरे; बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर भावनिक साद
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं आज शिवतीर्थावर भव्य आयोजन करण्यात आलं. तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसल्याने शिवतीर्थावर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत शिवतीर्थ गजबजून टाकलं.
“महाराष्ट्र धर्माची पताका उंच ठेवा आणि शिवतीर्थावर या,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या हाकेला मनसैनिक आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभेदरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि महायुतीवर जोरदार टीकेची झोड उठवली. विशेषतः उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत साऱ्यांवर घणाघाती शब्दांत हल्लाबोल केला.
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात “मराठी बांधवानो” अशा शब्दांत केली, तर उद्धव ठाकरे यांनी “हिंदू बांधवानो” असा उल्लेख केला. यावरून उद्या मोठी चर्चा होईल, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “भाजप म्हणते महापौर हिंदू होणार, आम्ही म्हणतो महापौर मराठी होणार. आधी फडणवीस खरे हिंदू आहेत का, हे तपासायला हवं,” असं म्हणत त्यांनी राजकीय हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे कौतुकास्पद असल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “फक्त पोटात तिडीक असून चालणार नाही, डोक्यातही ती असली पाहिजे. नाहीतर शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही.”
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझे आजोबा त्या लढ्याच्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये होते आणि आज पुन्हा तसाच संघर्ष सुरू आहे.” महापालिका निवडणूक आली की भाजप हिंदू-मुस्लिमचा ‘रोम्बासोम्बा डान्स’ खेळते, अशी टीकाही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला त्यांच्या पैशांची गरज नाही. पण मी फडणवीसांना आव्हान देतो—मोदींपासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत कोणाचंही हिंदू-मुस्लिमशिवाय भाषण दाखवा, आम्ही एक लाख रुपये देऊ.” त्यांनी अदानीकरणावरही घणाघात करत, “मुंबादेवीवरून मुंबईचं नाव पडलं, आता त्या मुंबईचं नाव ‘बॉम्बे’ करण्याचा डाव सुरू आहे,” असा आरोप केला.
भ्रष्टाचारावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आपण पाहतोय ते प्रदूषण नाही, तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. तीन लाख कोटींचा घोटाळा झाला आहे.” २५ वर्षांत शिवसेनेने केलेली कामं आणि मागील तीन वर्षांत मुंबईची झालेली अवस्था याचा हिशेब जनतेने मागावा, असं आवाहन त्यांनी केलं. “रक्त सांडून मिळवलेली मुंबई वाचवण्यासाठी आम्ही लढतोय, तुमची साथ हवी,” असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना साद घातली.
“शिवसेना मोदींना नको, कारण मुंबई गिळता येणार नाही,” असा आरोप करत ठाकरे–पवार ही नावं पुसून टाकण्याचा डाव असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आठवत, “कोणी अंगावर आलं, तर हात उखडून टाका,” असं स्पष्ट विधान त्यांनी केलं.
ढोंगी हिंदुत्वावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “ढोंगावर लाथ मारा. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे.” सत्ता असूनही संभाजीनगरसारख्या शहरात पाण्याची समस्या कायम असल्याचं सांगत त्यांनी ‘डबल इंजिन’ सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “आता ट्रिपल इंजिन आहे, पण तुमचं इंजिन वाफा सोडतंय,” असा टोला त्यांनी लगावला.
भाजपला मिळालेल्या निधीचा उल्लेख करत, मुंबईला मिळायचा विकास निधी अद्याप प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवारांवरील आरोपांवरूनही त्यांनी भाजपला जाब विचारला.
शिवतीर्थ म्हणजे केवळ मैदान नाही, तर ठाकरे कुटुंबासाठी भावनिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. बीएमसी निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे मनसैनिक आणि शिवसैनिकांचं जुने स्वप्न पूर्ण झाल्यासारखं मानलं जात आहे. तब्बल ७५ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाची महापालिका असलेल्या मुंबईवर पुन्हा ठाकरे बंधूंची सत्ता येणार का, याचा फैसला आता मतदारांच्या हाती आहे.




