spot_img

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर पण कोणाला ते नक्की जाणून घ्या

spot_img

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारी, खासगी आस्थापनांना सुट्टी बंधनकारक; बाहेर काम करणाऱ्या मुंबईकरांनाही लाभ

मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक तयारीला वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी, गुरुवार 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागासह उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंदर्भात स्वतंत्र अध्यादेश काढले आहेत. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच खासगी कंपन्यांना लागू राहणार आहे. विशेष बाब म्हणजे, जे मतदार मुंबईत नोंदणीकृत असून कामानिमित्त शहराबाहेर कार्यरत आहेत, अशांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू असणार आहे.

शासकीय आदेशानुसार ही सुट्टी केवळ सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसून केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी व सरकारी बँका, आयटी कंपन्या, मॉल्स, दुकाने, कारखाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे आणि इतर औद्योगिक व व्यापारी आस्थापनांनाही बंधनकारक असेल.

तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जे ठाणे, नवी मुंबई किंवा पालघर येथे नोकरीस जातात, त्यांनाही मतदानासाठी हीच सवलत देण्यात आली आहे.

मात्र, अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवा जिथे पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नाही किंवा जिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी नियमांमध्ये मर्यादित शिथिलता देण्यात आली आहे. अशा आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे अनिवार्य आहे. यासाठी योग्य कारणे व प्रशासनाची परवानगी आवश्यक राहणार आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत. जर एखाद्या आस्थापनेने सुट्टी किंवा मतदानासाठी सवलत देण्यास नकार दिला, तर नागरिक 9122-31533187 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.

लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने सहभाग घ्यावा, कामाच्या कारणामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ