spot_img

Delay Civic Poll Results : महापालिका निवडणूक निकालांना विलंब? मतमोजणीच्या पद्धतीवर संभ्रम कायम

spot_img

एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होण्याची शक्यता; मोठ्या महापालिकांचे निकाल मध्यरात्रीपर्यंत लांबण्याची भीती

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 16 जानेवारी रोजी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी मतमोजणीची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक वेळखाऊ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्व वॉर्डची मतमोजणी एकाचवेळी न होता, एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी केली जाण्याची शक्यता असल्याने निवडणूक निकाल रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल आणि त्यानंतर वॉर्डनिहाय EVM मतमोजणी केली जाणार आहे. मात्र, एका वॉर्डची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी सरासरी एक ते दीड तासांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्या महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या अधिक आहे, तिथे निकाल रात्री उशिरापर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंतही स्पष्ट होणार नाहीत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

कमी प्रभाग असलेल्या महापालिकांचे निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असली, तरी राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल मिळण्यास मोठा विलंब होऊ शकतो. यामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रावर दीर्घकाळ ताटकळत राहावे लागण्याची शक्यता आहे.

विशेषतः देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबईत 227 प्रभाग असून 23 विभागीय निवडणूक कार्यालयांअंतर्गत मतमोजणी होणार आहे. प्रत्येक कार्यालयात साधारण 8 ते 10 प्रभागांची मतमोजणी होईल. टपाली मतदानानंतर जर एकावेळी एकच प्रभाग मोजण्याची पद्धत अवलंबली गेली, तर मुंबईतील मतमोजणी प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतमोजणी लांबल्यास पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येण्याचीही शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, हुल्लडबाजी, तसेच मतमोजणीदरम्यान होणारे आक्षेप आणि वाद यामुळे ही प्रक्रिया अधिक किचकट ठरण्याची भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मतमोजणी कोणत्या पद्धतीने करावी याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, यासाठी संबंधित महापालिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवले असून अद्याप अंतिम निर्णय स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे निकालांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ