RCTI वाहिनीवरून प्रसारण बंद, चाहत्यांकडून भावनिक प्रतिक्रिया आणि शो पुन्हा सुरू करण्याची मागणी
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या बालपणाचा अविभाज्य भाग ठरलेला डोरेमॉन कार्टून अखेर इंडोनेशियात बंद करण्यात आला आहे. तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा लोकप्रिय शो इंडोनेशियातील प्रसिद्ध RCTI टीव्ही चॅनेलवरून हटवण्यात आला असून 25 डिसेंबर 2025 पासून तो वाहिनीच्या वेळापत्रकात दिसत नाही.
या निर्णयाबाबत RCTI वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण आहे. सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर, डोरेमॉनच्या चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शो पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. अनेकांनी डोरेमॉन त्यांच्या बालपणाच्या आठवणींशी जोडलेला असल्याचं सांगत भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नोबिता, डोरेमॉन, शिझुका, जियान आणि सुनियो या पात्रांनी अनेक पिढ्यांना हसवलं, रडवलं आणि जीवनाचे छोटे धडे दिले. अडचणीत सापडलेल्या नोबितासाठी कायम धावून येणारा डोरेमॉन केवळ कार्टून पात्र न राहता मित्रासारखा वाटू लागला. त्यामुळे हा शो अचानक बंद झाल्याची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे.
डोरेमॉन म्हणजे फक्त एक कार्टून नाही, तर जगभरातील लाखो लोकांच्या बालपणातील गोड आठवणी आहेत. त्यामुळेच त्याच्या भविष्याबाबत स्पष्टता द्यावी आणि शो पुन्हा प्रसारित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.




