spot_img

Thackrey Brothers : मुंबई, मराठी माणूस आणि सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखतीतून घणाघाती टीका

spot_img

२० वर्षांनंतर राज–उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अडकलेल्या महाराष्ट्रात अखेर सर्वात चर्चेचा राजकीय क्षण घडला आहे. संपूर्ण राज्य ज्याची आतुरतेने वाट पाहत होतं, त्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या मनसेने येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून, ‘मुंबई वाचवा’ हा नारा देत त्यांनी थेट मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक यंदा अत्यंत प्रतिष्ठेची ठरली असून, मुंबईचा कारभार नेमका कोणाच्या हातात जाणार आणि मुंबईचा महापौर मराठी माणूसच असेल का? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल स्पष्ट होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, रोड शो आणि राजकीय मुलाखतींना वेग आला आहे.

२० वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत नुकतीच पार पडली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली. टीझरनंतरच चर्चेत आलेल्या या मुलाखतीच्या पहिल्या भागात राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईचं भविष्य, भाजप, महायुती सरकार, भ्रष्टाचार आणि मुंबईतील परप्रांतीय लोंढ्यांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली.

मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी “महाराष्ट्रात मराठी माणसाचं डेथ वॉरंट निघतंय” असा आरोप केला, यावर राज आणि उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली. राज ठाकरे म्हणाले की, निर्णय घेणारी माणसं स्वतःहून काम करत नाहीत, त्यांना बसवलं जातं. फाइल्स येतात आणि सही केली जाते. त्याचा फटका थेट मराठी माणसाला बसतोय, हे लोकांना उशिरा का होईना कळेल.

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ‘मूळ मुंबईकर’ ही संकल्पना पुढे मांडली. “आम्ही इथे जन्मलो, वाढलो. आम्ही मुंबईकर आहोत. पण सत्तेत बसलेले अनेकजण बाहेरचे आहेत. फडणवीस नागपूरचे आहेत,” असं म्हणत त्यांनी थेट निशाणा साधला.

आपला मुद्दा स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी स्वित्झर्लंडमधील अनुभव सांगितला. ते म्हणाले, एखाद्या शहरात जन्म न घेता तिथल्या समस्या समजणं शक्य नसतं. बाहेरून येऊन फक्त दिसणारं चांगलं वाटतं, पण आतल्या अडचणी कळत नाहीत. मुंबईत सगळं उपलब्ध दिसत असल्यामुळे बाहेरच्या मंत्र्यांना इथे समस्या आहेतच असं वाटत नाही, आणि याच मानसिकतेतून मुंबईच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

एकूणच ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मुलाखतीतून मुंबई, मराठी अस्मिता आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील संघर्ष नव्याने पेटल्याचं स्पष्ट होत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही युती आणि त्यांचा आक्रमक सूर राजकीय समीकरणं बदलणारा ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ