चार वर्षे निवडणुका न घेण्यामागे केवळ तांत्रिक कारण नाही, तर मुंबई ताब्यात घेण्याचे नियोजन – राज ठाकरे यांचा खळबळजनक दावा
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपांची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीत दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुका चार वर्षे का लांबवण्यात आल्या, यावर थेट सवाल उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले की, २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर मुंबई महापालिका बरखास्त झाली. मात्र २०२६ उजाडूनही निवडणुका का झाल्या नाहीत, हा मोठा प्रश्न आहे. हा विलंब अपघाती किंवा तांत्रिक नसून, मुंबईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आखलेला सुनियोजित डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. २०२४ ते २०२५ या काळात पडद्यामागे नेमके काय घडले, याचा गौप्यस्फोट आपण येत्या काळात जाहीरपणे करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, “मराठी माणसाच्या सहीनेच मराठी माणसाचे डेथ वॉरंट काढले जात आहे,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे संतप्त झाले. सध्या सत्तेत बसवलेली माणसे फक्त कागदांवर स्वाक्षरी करण्यापुरती असून, मुंबईला भाजपच्या माध्यमातून अदानींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आपणच काय चुका करत आहोत, हे मराठी माणसाला उशिरा का होईना समजेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवरही प्रहार केला. त्यांनी स्वित्झर्लंडचे उदाहरण देत सांगितले की, एखाद्या शहरात जन्म घेतल्याशिवाय त्या शहराच्या नसानसातले प्रश्न कळत नाहीत. बाहेरून येणाऱ्या मंत्र्यांना मुंबईत रस्ते, पाणी आणि वीज पाहून सर्व काही ठीक वाटते, कारण ते आपल्या भागातील अडचणींशी तुलना करतात. मात्र मुंबईचे प्रश्न, इथला संघर्ष आणि जगण्याची धडपड वेगळी आहे, ती बाहेरच्यांना कधीच समजणार नाही, असा ठाम दावा राज ठाकरे यांनी केला.




