spot_img

Vikram Bhatt Fraud Case : विक्रम भट्ट फसवणूक प्रकरणावर राजस्थान उच्च न्यायालयाचा FIR रद्द करण्यास नकार

spot_img

करारभंग नव्हे तर आर्थिक अपहार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप; न्यायालयीन कोठडीतच राहणार भट्ट दाम्पत्य

मनोरंजनसृष्टीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सोमवारी न्यायालयाने भट्ट यांच्याकडून दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भट्ट आणि त्यांच्या पत्नीला सध्या न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली की, हा वाद केवळ करारभंगापुरता मर्यादित नाही. प्राथमिक तपासात फसवणूक, आर्थिक अपहार, बनावट बिलांचा वापर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे पोलीस तपासात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने सांगितले की, आरोप गंभीर स्वरूपाचे असून, तपास प्रक्रियेला संधी देणे आवश्यक आहे. उदयपूर येथील अजय मुरडिया यांनी विक्रम भट्ट, श्वेतांबरी भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. चित्रपट प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

भट्ट यांच्यावतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, हा वाद पूर्णपणे व्यावसायिक आणि कराराशी संबंधित आहे. तसेच वाद निवारणासाठी उदयपूरऐवजी मुंबई हेच योग्य अधिकार क्षेत्र असल्याचा दावा करण्यात आला. वकिलांनी सांगितले की, 40 कोटी रुपयांत चार चित्रपट निर्मितीचा करार झाला होता आणि त्यानंतर आणखी 7 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. चारपैकी एक चित्रपट पूर्ण झाला असून, त्यानंतर तक्रारदाराने निधी देणे थांबवले, असा दावा करण्यात आला.

मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळत सांगितले की, प्रकरणात जाणूनबुजून अप्रामाणिकपणा आणि आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. याआधी मुंबई उच्च न्यायालयानेही भट्ट यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस तपास सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ