महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने लढा देत वास्तववादी अभिनयाला प्राधान्य देणारी अजरामर कलाकार
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत स्मिता पाटील हे नाव केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे, तर विचारशील आणि निर्भीड भूमिकांसाठी ओळखले जाते. आपल्या सशक्त अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. विविध सामाजिक आशयाच्या भूमिका साकारत त्यांनी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि सिनेमातील स्त्रीप्रतिमेवर सुरू असलेल्या चुकीच्या प्रवाहाला उघडपणे आव्हान दिलं.
स्मिता पाटील यांनी नेहमीच महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. चित्रपटांमध्ये महिलांना केवळ आकर्षण किंवा वस्तू म्हणून दाखवण्याच्या पद्धतीवर त्यांनी कडाडून टीका केली. महिलांना अर्धनग्न किंवा बोल्ड स्वरूपात सादर करून चित्रपट विकण्याची मानसिकता चुकीची असल्याचं त्यांनी अनेक मुलाखतींमधून स्पष्ट केलं.
एका जुन्या मुलाखतीत त्यांनी ठामपणे मांडलेलं मत आजही तितकंच बोलकं आहे. त्या म्हणाल्या होत्या की, एखादा चित्रपट हिट करण्यासाठी अर्धनग्न स्त्रीदेह दाखवणं आवश्यक नाही. पुरुषांना अशा पद्धतीने सादर करण्याचा विचारही केला जात नाही, मात्र महिलांच्या बाबतीत हे मुद्दाम मार्केटिंगचं साधन बनवलं जातं. ही वृत्ती भारतीय प्रेक्षकांवर लादली गेली असल्याचं त्यांचं मत होतं.
स्मिता पाटील यांना कधीच ग्लॅमरस भूमिका करण्याची ओढ नव्हती. वास्तव, संघर्ष आणि मानवी भावना यांचं प्रामाणिक चित्रण असलेले चित्रपट त्यांनी नेहमी निवडले. ‘सत्यम शिवम सुंदरम’ किंवा ‘राम तेरी गंगा मैली’सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना अर्धनग्न दाखवण्यावर त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
विशेष म्हणजे ‘चक्र’ या चित्रपटातील त्यांचा एक आंघोळीचा प्रसंग पोस्टरवर वापरण्यात आला होता. त्या पोस्टरची देशभर चर्चा झाली, मात्र अशा प्रकारे दृश्यांचा वापर करून चित्रपट विकण्याच्या प्रवृत्तीवरही स्मिता पाटील अस्वस्थ होत्या.
दुर्दैवाने, स्मिता पाटील यांनी अत्यंत लवकर जगाचा निरोप घेतला. 13 डिसेंबर 1986 रोजी, बाळंतपणानंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. मात्र आजही त्यांचे चित्रपट, त्यांचा विचार आणि स्त्रीसन्मानासाठीचा लढा प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.




