नवी मुंबई : विजय गायकवाड
नेरुळ (Nerul) प्रभाग क्रमांक २० मधीलभाजपात सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाला उघड स्वरूप मिळाले असून, भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नाईक गटाने स्वतःच्या समर्थकांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सचिव तसेच वसई-विरार व कोकणचे प्रभारी राजेश नरेश पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे नेरुळ आणि सीबीडी बेलापूर परिसरातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. यावेळी विजय कश्यप, अरुण पाटील, कुंदन पाटील, अरविंद गौड, आनंद गौड, राजकुमार गौड, आकाश गौड, धर्मेंद्र, साईनाथ साळुंखे आणि राहुल खरात यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला.याचवेळी भाजप सहकार सेलचे सचिव व संयोजक प्रणित सिन्हा यांनीदेखील मूळ भाजप कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा केली. “पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असताना गप्प बसणे शक्य नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाकडून आणखी एक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सीबीडी पॅनल क्रमांक २८ ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सुदिप घोलप यांना शिवसेनेचे पुरस्कुत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. या घोषणेनंतर दिपाली घोलप यांनी शिवसेना उपनेते विजय नाहटा,जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, जिल्हा महिला संघटक सरोज पाटील आणि शहरप्रमुख विजय माने यांचे आभार मानले. मूळ शिवसैनिकाला संधी दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत “हा पाठिंबा म्हणजे कार्यकर्त्यांना मिळालेला न्याय आहे,” अशी भावना व्यक्त केली. दिपाली घोलप या उच्चशिक्षित असून, त्यांनी मुंबई विद्यापीठातून हिंदी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. २०१३ पासून त्या सीबीडी बेलापूर परिसरात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, शिक्षण, क्रीडा, आरोग्य आणि नागरी समस्या यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. अनेक स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. शिवसेनेच्या या पाठिंबा आणि सलग होत असलेल्या प्रवेशांमुळे सीबीडी बेलापूर आणि नेरुळ परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत (Navi Mumbai Municipal Corporation) शिवसेना आणि भाजप यांच्यात युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजी आणि शिवसेनेत होणारे प्रवेश हे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




