‘इक्कीस’च्या विशेष प्रदर्शनात बॉलिवूड भावूक; पोस्टर पाहून सलमानच्या डोळ्यांत अश्रू, रेखांनी अगस्त्य नंदावर उधळलं प्रेम
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. ते आज आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांमधून, गाण्यांतून आणि आठवणींतून ते कायम जिवंत राहणार आहेत. धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट ‘इक्कीस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, हा चित्रपट अनेक अर्थांनी खास ठरणार आहे.
‘इक्कीस’मध्ये प्रेक्षकांना धर्मेंद्र यांना शेवटच्या वेळेस मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काल, 29 डिसेंबर रोजी या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग पार पडलं. यावेळी अनेक नामवंत बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
स्क्रीनिंगदरम्यान सर्वांच्याच भावना अनावर झाल्या. धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल देखील या प्रसंगी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे सलमान खानही या स्क्रीनिंगला उपस्थित होता. धर्मेंद्र आणि सलमान खान यांच्यातील नातं अतिशय जिव्हाळ्याचं होतं. त्यामुळे पोस्टरसमोर उभा राहिलेला सलमान काही क्षण स्तब्ध झाला. डोळ्यांत पाणी येऊनही तो काहीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेला.
धर्मेंद्र यांचे निधन सलमानसाठी वैयक्तिक धक्का होता. बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीतही सलमानने त्यांच्या आठवणींना उजाळा देत, “आपण ही-मॅन गमावला आहे. धरमजींसारखा माणूस पुन्हा होणं कठीण आहे,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, या स्क्रीनिंगला अभिनेत्री रेखा यांचाही विशेष अंदाज पाहायला मिळाला. अगस्त्य नंदाचा हा पहिलाच चित्रपट असल्याने त्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अगस्त्यच्या पोस्टरला त्यांनी चुंबन देत त्याचं कौतुक केलं.
सृजितम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा वॉर ड्रामा चित्रपट असून, तो सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे. 1971 च्या भारत–पाकिस्तान युद्धात अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं होतं. परमवीर चक्र मिळवणारे ते सर्वात तरुण शूरवीर होते. या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘इक्कीस’ हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.




