उदय सामंत पुण्यात दाखल; भाजप–शिवसेना युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
पुण्यात शिवसेना (शिंदे गट) मध्ये काल रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरू होत्या. सुरुवातीला महापालिका निवडणुकीसाठी 60 हून अधिक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. मात्र, रात्री मुंबईहून वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबत संदेश आल्याने हेच एबी फॉर्म अचानक माघारी घेण्यात आल्याची माहिती आहे.
शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्यानेच सुरुवातीला फॉर्म वाटप करण्यात आले होते. मात्र, भाजपसोबत युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याने ऐनवेळी भूमिका बदलली आणि त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत तातडीने पुण्यात दाखल होत असून, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्या असून, योग्य वेळी सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो आदेश असेल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, त्याचा निर्णय लवकरच कळेल. काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले असले तरी अद्याप सर्वांना एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मी धंगेकर यांनी एनसीपीच्या नेत्यांची भेट घेतल्याच्या चर्चांवर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, त्याबाबत आपल्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. ती केवळ सदिच्छा भेट असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. काल एबी फॉर्म दिले आणि रात्री परत घेतले, या निर्णयामागील नेमकी कारणे सध्या सांगता येणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यातील या घडामोडींमुळे शिवसेना–भाजप युतीबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




