माहिम, शिवडी आणि विक्रोळीवर मनसेचा आग्रह; अंतिम निर्णयासाठी उद्धव–राज ठाकरे समोरासमोर बसण्याची शक्यता
राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संभाव्य युती चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सातत्याने बैठका होत असून मुंबईतील बहुतांश प्रभागांवर सहमती झाल्याचे चित्र आहे. मात्र, तीन महत्त्वाच्या विधानसभा क्षेत्रांमुळे ही युती अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी मनसेने किमान तीन जागांची ठाम मागणी केली आहे. यामध्ये माहिम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा क्षेत्रांतील प्रभागांचा समावेश आहे. माहिम हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथे अधिक जागा देण्यास ठाकरे गट तयार नसल्याचे संकेत आहेत. शिवडीमध्ये अजय चौधरी तर विक्रोळीत सुनील राऊत हे ठाकरे गटाचे आमदार असल्याने या भागांत जागावाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांत संजय राऊत, अनिल परब, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या. बहुतांश जागांवर तोडगा निघाला असला तरी या तीन मतदारसंघांवर मात्र सहमती होत नसल्याने प्रश्न प्रलंबित आहे. परिणामी, आता हा निर्णय थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हातात गेला आहे.
महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी मराठी मतांचे विभाजन टाळणे हे दोन्ही ठाकरेंचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, या तीन जागांवर सन्मानजनक तोडगा न निघाल्यास ठाकरे–मनसे युती प्रत्यक्षात येणार की नाही, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




