हॉट-पिंक आऊटफिटमधील फोटो शेअर करत दिली खुशखबर; फॅन्स आणि आहूजा कुटुंबात जल्लोषाचा माहोल
बॉलिवूडची फॅशन डीवा म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर (Sonam Kapoor) आता पुन्हा एकदा आई होण्याच्या तयारीत आहे. अखेर बराच काळ चर्चेत असलेली ही बातमी तिने स्वतःच निश्चित केली आहे. गुरुवारी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सोनमने पहिल्यांदाच आपला बेबी बंप दाखवला आणि “MOTHER” असं एकच शब्दात सांगत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
या फोटोमध्ये सोनमने हॉट-पिंक कलरचा स्टायलिश वूल सूट परिधान केला आहे. ओव्हरसाईझ्ड शोल्डर्स आणि युनिक कट्समुळे तिचा लूक आणखीनच ग्लॅमरस दिसला. अनेक चाहत्यांनी तर तिला “प्रेग्नन्सीमधली देसी प्रिन्सेस डायना” अशी प्रतिक्रिया दिली आहे. पती आनंद आहूजानेही पोस्टवर “Double Trouble” अशी मजेशीर कमेंट करत आनंद व्यक्त केला.
सोनम आणि आनंद आहूजा (Aanad Ahuja) २०१८ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांच्या पहिल्या मुलाचा, वायुचा जन्म २०२२ मध्ये झाला. आता चार वर्षांनंतर कपूर आणि आहूजा कुटुंबात दुसऱ्या बाळाचं आगमन होणार असल्याने घरात आनंदाचं वातावरण आहे.
गर्भारपणाची घोषणा करण्यापूर्वीच सोनमने दोन वेगवेगळ्या स्टायलिश लुक्समध्ये स्वतःचे फोटो शेअर करुन “Shaadi ready…two days and two looks I loved!” असं लिहिलं होतं. एका फोटोमध्ये ती आनंदसोबत दिसली होती, तर दुसऱ्यात निळ्या साडीत पारंपरिक दागिन्यांसह सोनमच्या इंडो-वेस्टर्न फॅशनची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.
अनिल कपूर यांची मुलगी असलेली सोनम कपूरने अभिनयापूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ‘सावरिया’पासून सुरू झालेल्या तिच्या करिअरमध्ये ‘रांझणा’, ‘नीरजा’, ‘भाग मिल्खा भाग’ आणि ‘संजू’ यांसारखे अनेक हिट चित्रपट आहेत. २०२३ मध्ये ती ‘ब्लाइंड’ या थ्रिलरमध्ये झळकली होती.




