‘परंपरेच्या नावाखाली फटाके फोडणे थांबवा,’ अभिनेत्याच्या पत्नीची साद; AQI 300 पार
दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीने मुंबई आणि दिल्लीच्या हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. मंगळवारी मुंबईत हवेचा निर्देशांक (AQI) 211 वर पोहोचला, जो ‘वाईट’ श्रेणीत मोडतो, तर बुधवारी वांद्रे परिसरात धुराचे जाड थर दिसून आले आणि AQI 300 पर्यंत गेला. दिल्लीत तर परिस्थिती आणखी बिकट असून, AQI 345 वर नोंदला गेला, ज्याला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत टाकले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी फटाक्यांचा मारा झाल्याने धुराचे लोट हवेत पसरले, ज्यामुळे श्वसनाचे प्रश्न उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.या गंभीर मुद्द्यावर अभिनेता शाहिद कपूर (Shahid kapoor) यांची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) हिने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “परंपरा किंवा मुलांच्या मनोरंजनाच्या नावाखाली फटाके फोडणे थांबवायला हवे. इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी हातात ‘सुरसुरी’ घेणेही चुकीचे आहे. या गोष्टींना ‘सर्वसामान्य’ ठरवणे बंद करा. जर आपणच असे केले, तर आपली मुलेही तेच शिकतील आणि याला अंतच राहणार नाही. ‘पृथ्वी दिना’ला तुम्ही मुलांकडून ‘फटाक्यांना नाही’ असे पोस्टर बनवता आणि दिवाळीला सर्व विसरता. AQI ही फक्त स्टोरी टाकण्याची गोष्ट नाही; ही हवा आपली मुले श्वासात घेत आहेत.”पुढे ती म्हणाली, “शिक्षण, जागरूकता आणि समृद्धी असूनही सामान्य ज्ञानाचा अभाव दुखद आहे. अशा परंपरेत मला सहभागी व्हायचे नाही. फटाक्यांचा आनंद घेताना मी माझ्या मुलांना ते पाहायला पाठवणार नाही. कृपया हे थांबवा!” मीराच्या या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून, अनेक सेलिब्रिटींनीही फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आवाज उठवला आहे. मुंबई आणि दिल्लीतील हवेची बिघडती गुणवत्ता पाहता, यंदाच्या दिवाळीत पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचे आवाहन अनेकांकडून केले जात आहे.




