spot_img

Prakash Mahajan : फेसबुक पोस्टमध्ये करुणा-भुजबळांवर टीका, ‘भ्रष्टाचारी आणि कुंकवाची अब्रू टांगणाऱ्या’ लोकांनी वारसा ठरवू नये – महाजन

spot_img

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या राजकीय वारशावरून महाराष्ट्राच्या राजकीय पटावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. यात आता एक वेगळाच वळण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर नेहमीच टीका करणाऱ्या करुणा मुंडे शर्मा (Karuna Munde) यांनी त्यांना ‘गोपीनाथरावांचे खरे वारसदार’ म्हणून सन्मानित केले आहे. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने त्यांनी धनंजयांच्या राजकीय संघर्षाचे कौतुक करताना कुटुंबातील वाद किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. मात्र, या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.करुणा मुंडे यांनी स्पष्टपणे म्हटले की, ‘राजकारणात पोटाचा वारसा नसतो, तर विचारांचा असतो.

धनंजय मुंडे यांनी २००९ ते २०१९ या काळात केलेल्या संघर्षाचे मी साक्षीदार आहे. त्यांनी गोपीनाथरावांसारखेच तळागाळापर्यंत जाऊन स्वतःचे स्थान कमावले. छगन भुजबळ (Chhgan Bhujbal) यांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेत जे सांगितले, ते १०० टक्के सत्य आहे. धनंजय हेच गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार आहेत, आणि त्यांची सून म्हणून मीही त्यांच्यासोबत आहे.’ त्या पुढे म्हणाल्या, ‘पंकजा मुंडेंना हरवण्यामागे भाजपाचा हात होता, ज्यामुळे त्या खचल्या आणि डिप्रेशनमध्ये गेल्या. तेव्हा धनंजयांनी भाऊ म्हणून साथ दिली. माझा धनंजयांशी वाद नाही, तर त्यांच्या वृत्तीशी आहे.’दुसरीकडे, छगन भुजबळ यांनी बीड सभेत धनंजयांना ओबीसींच्या न्यायासाठी लढणारे नेते म्हणून गोपीनाथ मुंडेंचे वारसदार घोषित केले होते. हे विधान राजकीयदृष्ट्या धनंजयांच्या राष्ट्रवादीतील भूमिकेला बळकटी देणारे ठरले.

मात्र, या सगळ्यावर प्रकाश महाजन यांनी तोंडसुख घेतले आहे. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडे आणि भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला असून, पंकजा मुंडे यांचेच गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार असल्याचे ठासून सांगितले. ‘क्या जमाना आ गया? स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा कोण ठरवत आहे? एक भ्रष्टाचारी ज्याने कारागृहात महिने काढले, आणि दुसरी जी रोज उठून आपल्या कुंकवाची अब्रू जगासमोर टांगते. मुंडे साहेबांचा वारसा, मग तो सामाजिक असो वा राजकीय, फक्त आणि फक्त माझी पंकू ताईच आहेत.

दुसरे कोणी नाही!’ असे ते म्हणाले. ‘पंकजा, प्रीतम आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यच पुढील वारसा ठरवतील. मी माझ्या भाचीवर (पंकजा) प्रेम करतो, त्यात दुसऱ्याला हरकत नाही,’ असे ते म्हणाले. या पोस्टमुळे मुंडे कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा समोर आला असून, ओबीसी राजकारणातही नवीन उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश महाजनांच्या शब्दांनी राजकीय वातावरण आणखी तापले असून, पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून अद्याप प्रत्यक्ष प्रतिक्रिया आलेली नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ