सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप आणि पोस्ट व्हायरल; ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत सुरक्षा यंत्रणा सतर्क
बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याच्याशी असलेल्या वादामुळे सतत चर्चेत असणारी कुख्यात बिश्नोई गँग आता दुसऱ्या एका मोठ्या अभिनेत्याच्या मागे लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ ‘आरझू बिश्नोई’ आणि ‘टायसन बिश्नोई’ यांनी एका पोस्टसह ऑडिओ क्लिप शेअर करून ही धमकी दिल्याचं समोर आलं असून, यामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या धमकीच्या वृत्ताला अद्याप कोणत्याही अधिकृत सूत्राकडून पुष्टी मिळालेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आमिर खानवर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या या हँडलवरून आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याला लक्ष्य करण्याचे हेच मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. ‘जय श्री राम, जय सीता राम’ अशी सुरुवात करत या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमिर खानसारखे लोक देशात लव्ह जिहादला खतपाणी घालत असून ही गोष्ट आमच्या संस्कृती, सनातन धर्म आणि राष्ट्राच्या विरोधात आहे. स्टारडमच्या नावाखाली असे कृत्य करणाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू आणि त्यांचे श्वास रोखू”. उल्लेखनीय म्हणजे, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून आधीच त्याच्या विरोधात काही ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आता ही थेट धमकी समोर आली आहे.
या गंभीर प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर आणि सुरक्षा शाखा सतर्क झाल्या असून सोशल मीडियावरील त्या कथित पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप मुंबई पोलिसांकडे कोणतीही अधिकृत किंवा लेखी तक्रार दाखल झालेली नाही. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर आणि व्हायरल दाव्यांवर अभिनेता आमिर खान किंवा त्याच्या मॅनेजमेंट टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पोलिस सध्या या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेचा तपास करत आहेत.




