डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना कथित मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आता कारवाईचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे याला विष्णूनगर पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली असून, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रमेश म्हात्रे याला यापूर्वी न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आरोपीने निर्धारित वेळेत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे, असे आदेश देण्यात आले.
उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आणि रमेश म्हात्रे याला अधिकृत नोटीस बजावली. या नोटिशीद्वारे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीने दिलेल्या मुदतीत आत्मसमर्पण केले नाही, तर त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे पोलिस यंत्रणा या प्रकरणात सतर्क झाली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील कथित मारहाण प्रकरणामुळे डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातही या कारवाईची चर्चा सुरू आहे.




