Parth Pawar : पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याची मागणी; राष्ट्रवादीच्या उदय आहेर यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ

spot_img

पार्थ पवारांच्या लंडन येथील उच्च शिक्षणाचा आणि भाषाप्रभुत्वाचा हवाला देत उदय आहेर यांनी सुनेत्रा पवारांकडे केली शिफारस

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या राजकारणात सध्या एका नव्या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक विशेष पत्र लिहिले असून, त्यात राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या पत्रात आहेर यांनी पार्थ पवार यांना मंत्री का करावे, याबद्दल तब्बल आठ प्रमुख कारणे दिली आहेत. त्यात त्यांनी पार्थ पवार हे २१ व्या शतकातील तरुणांचे व्हिजनरी नेतृत्व असून, त्यांचे लंडन येथे उच्च शिक्षण झाले असल्याचे नमूद केले आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषांवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे पक्षाला राष्ट्रीय पातळीवर फायदा होईल, असा दावा केला आहे. शिव, शाहू, फुले व आंबेडकरांचे विचार देशभरात पोहोचवण्यासाठी आणि तरुणांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पार्थ पवार हेच योग्य चेहरा असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

या पत्रात उदय आहेर यांनी पार्थ पवार यांच्यावर होणाऱ्या राजकीय परिपक्वतेच्या आरोपांवरून पक्षातीलच विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचा दाखला देत, सध्याच्या काळातही काही “अनाजीपंत” पार्थ पवारांचे राजकीय करिअर सुरू होण्यापूर्वीच संपवण्याचा आणि त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पार्थ पवारांचे ‘मोरल डाऊन’ करण्यात आले होते, असे सांगत अजितदादांचे त्यांना मोठी संधी देण्याचे अपूर्ण स्वप्न आता पूर्ण करावे, अशी भावनिक सादही त्यांनी घातली आहे. दरम्यान, या पत्रानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पार्थ पवार यांच्याविरोधात तक्रार केल्याचा दावाही उदय आहेर यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संपूर्ण वादामुळे आगामी काळात राज्यात मोठे राजकीय धमाके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ