बहुचर्चित सामाजिक आशयावर आधारित ‘द इंडिया स्टोरी’ या आगामी चित्रपटाचा नवा आणि प्रभावी पोस्टर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मितीची धुरा सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. समाजातील गंभीर आणि संवेदनशील विषयाला स्पर्श करणारा हा चित्रपट कीटकनाशकयुक्त शेतीमुळे जनतेच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर भाष्य करणार आहे. या विषयाला कोर्टरूम ड्रामाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, न्याय, सत्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर उभा राहणार आहे.
नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल आणि अभिनेता श्रेयस तळपदे गंभीर आणि भावनिक वातावरणात दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव कथानकातील तणाव आणि संघर्षाची स्पष्ट झलक देतात. एका मोठ्या सत्याचा शोध घेताना त्यांच्या व्यक्तिरेखांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, याबाबतची उत्सुकता पोस्टरमुळे अधिक वाढली आहे. चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दमदार कथा, प्रभावी कलाकार आणि सामाजिक संदेश यामुळे ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी विचार करायला भाग पाडणारा सिनेमॅटिक अनुभव ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




