हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांपैकी ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पत्नी सुनीला प्यारेलाल शर्मा यांचे १२ जुलै २०२६ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती अधिकृत निवेदनातून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संगीतविश्वासह चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार, गायक आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूड गायिका प्रियांका मित्रा यांनी कुटुंबाच्या वतीने सोशल मीडियावर अधिकृत शोकसंदेश शेअर करत ही दुःखद माहिती दिली. त्या संदेशात, “अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही आमच्या प्रिय ‘अम्मा’ सुनीला प्यारेलाल शर्मा यांच्या निधनाची माहिती देत आहोत. १२ जुलै २०२६ रोजी त्यांनी शांततेत जगाचा निरोप घेतला. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रेम, माया, साधेपणा आणि कुटुंबासाठीच्या समर्पणाने भरलेले होते,” असे नमूद करण्यात आले आहे.
प्यारेलाल यांच्या यशस्वी संगीत प्रवासात सुनीला शर्मा यांची नेहमीच महत्त्वाची साथ होती, असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे शर्मा कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून, चाहत्यांकडून सोशल मीडियावर शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. संगीतविश्वातील अनेक मान्यवरांनीही त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहत प्यारेलाल आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.




