पाकिस्तान-चीनशी जवळीक साधणारा बांगलादेश पाणी वाटप करारासाठी भारतासमोर नतमस्तक; भविष्याची चिंता सतावू लागल्याने भाषेत बदल
मागील काही काळापासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंधांमध्ये कमालीचा तणाव पाहायला मिळत आहे. बांगलादेशातील सत्तांतरानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर झालेले अत्याचार आणि भारतीय दूतावासाला लक्ष्य करून करण्यात आलेले हल्ले यांमुळे दोन्ही देशांतील दरी वाढली आहे. एकीकडे भारताच्या सुरक्षेला आव्हान देत बांगलादेशाने पाकिस्तान आणि चीनशी आपली जवळीक वाढवली असली, तरी आता एका महत्त्वाच्या करारामुळे बांगलादेशाला भारताची मनधरणी करावी लागत आहे.
१९९६ मध्ये भारत आणि बांगलादेश दरम्यान झालेला ऐतिहासिक ‘गंगा जल संधी करार’ आता संपुष्टात येत असून, त्याच्या नूतनीकरणासाठी बांगलादेशची धडपड सुरू झाली आहे. जर भारताने या करारावर स्वाक्षरी केली नाही, तर बांगलादेशात पाण्याचे प्रचंड संकट उभे राहून आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कळत होईल, अशी भीती वर्तवली जात आहे. यामुळेच कालपर्यंत भारताविरोधी भाषा बोलणाऱ्या बांगलादेशचे सूर आता अचानक मवाळ झाल्याचे दिसत आहे.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी नुकत्याच झालेल्या एका परिषदेत यावर भाष्य करताना भारताकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली. “भारत आणि बांगलादेश दरम्यान पाणी वाटपाचा हा ३० वर्षांचा करार आता संपत आहे. हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा असून सध्या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. भारत याचे गांभीर्य ओळखून सकारात्मक पाऊल उचलेल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे.”
शमा ओबेद इस्लाम, परराष्ट्र मंत्री, बांगलादेश
बांगलादेश सध्या जरी भारतासमोर नरमाईची भूमिका घेत असला, तरी पडद्यामागे त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. पाकिस्तान आणि चीन या भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना हाताशी धरून बांगलादेश भविष्यात भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी गंगा नदीच्या पाणी वाटपावरून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशाची भाषा आता पूर्णपणे बदलली आहे. बांगलादेशचे जलभविष्यात पूर्णपणे भारताच्या निर्णयावर अवलंबून असल्याने ते हा करार यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आता बांगलादेशचा इतिहास, तिथली सद्यस्थिती आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करून नवी दिल्ली यावर काय अंतिम निर्णय घेते, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.




