चालत्या नंदिग्राम एक्सप्रेसमधील ‘रोमँटिक सजावट’ सोशल मीडियावर व्हायरल; सुरक्षा धोक्यात आणल्याप्रप्रकरणी डेकोरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
धावत्या रेल्वे प्रवासादरम्यान हनिमून साजरा करण्यासाठी एका जोडप्याने फर्स्ट क्लास एसी (First AC) डबा थेट फुलांनी आणि फुग्यांनी सजवून घेतल्याची एक आगळीवेगळी, पण तितकीच खळबळजनक बातमी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र, रेल्वे डब्यात केलेली ही रोमँटिक सजावट आता त्या नवदाम्पत्यासह संबंधित डेकोरेटरला चांगलीच महागात पडली आहे. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल एका रेल्वे कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले आहे.
नांदेडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ‘नंदिग्राम एक्सप्रेस’च्या अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यामध्ये (First AC) हा धक्कादायक प्रकार घडला. गाडी जालना रेल्वे स्थानकावर आली असताना, एका जोडप्यासाठी अजहर शेख वाहेद नावाच्या खासगी डेकोरेटरने रेल्वेच्या कूपेमध्ये (Coupe) अनधिकृत प्रवेश केला. त्याने डब्यामध्ये हजारो गुलाबाच्या पाकळ्या, आकर्षक फुगे, फुलांचे हार आणि भिंतीवर “I Love You” असा संदेश लिहून संपूर्ण डबा एखाद्या हॉटेलच्या खोलीसारखा सजवला. चालत्या ट्रेनमधील या भव्य सजावटीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत, रेल्वेच्या डब्यात अशा प्रकारच्या सजावटीमुळे आग लागण्याचा किंवा प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याचा प्रश्न उपस्थित केला.
सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. विनातिकीट प्रवास करणे, रेल्वे डब्यात अनधिकृत प्रवेश (Trespassing) आणि रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डेकोरेटर अजहर शेख वाहेदविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. फर्स्ट एसीसारख्या अतिसुरक्षित कोचमध्ये बाहेरील व्यक्ती विनापरवाना कशी काय प्रवेश करू शकते, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, या निष्काळजीपणात रेल्वेचे आणखी कोणते अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम रेल्वे प्रशासनाने दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




