Sanjay Raut : ‘गद्दारांच्या छताखाली पक्षाची बैठक घेण्याइतके आम्ही सहिष्णू नाही!’; संजय राऊतांचा थेट शरद पवारांवर निशाणा

spot_img

“जनतेला कुत्रे आणि भाडोत्री म्हणणारी ही तर भाजप-शिंदेंची सुलतानशाही”; मालवणमधील शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांवरही कडक प्रहार

“शरद पवार हे निश्चितच मोठे आणि आदरणीय नेते आहेत. परंतु, ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले, त्यांच्याच छताखाली जाऊन अशा बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते,” अशा अत्यंत तिखट शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर थेट विधानभवनात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यावर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी मविआतील घटक पक्षांनी काही पथ्ये पाळायला हवीत, असा सल्ला दिला.

राऊत पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला गद्दारी आणि भ्रष्टाचाराची वाळवी लावली आहे. बैठक घेण्यासाठी समोरच राष्ट्रवादी भवन आणि वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान असताना, आमदारांना घेऊन गद्दारांच्या दारात जाण्याची काय गरज होती? हा आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आम्ही असे कधीच केले नसते आणि अजित पवारांच्या दालनात तर कधीच पक्षाची बैठक घेतली नसती. आम्ही बेईमानी विसरणारे लोक नाही आणि एवढे मोठे मन दाखवण्याइतके आम्ही सहिष्णूही नाही.”

या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी केवळ पवारांवरच नव्हे, तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवरही जोरदार तोफ डागली. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी सरकारमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवले.
“जनतेच्या कराच्या पैशातून कोट्यवधींचे प्रकल्प उभे करायचे, त्यात ५०० कोटी रुपये स्वतःच्या खिशात घालायचे आणि नंतर कॅमेरे लावून आम्हीच हे केले, असा गाजावाजा करायचा, ही या सरकारची पद्धत आहे. जेव्हा हे प्रकल्प निकृष्ट कामामुळे कोसळतात आणि जनता त्यावर संताप व्यक्त करते, तेव्हा जनतेला ‘भाडोत्री तट्टू’ किंवा ‘कुत्रे’ म्हणून हिणवले जाते. हे फक्त एखाद्या सुलतानाच्या राज्यातच घडू शकते.”

शिवसेना नेत्याने थेट दिल्लीश्वरांवर प्रहार करत आरोप केला की, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे सर्वात मोठे षडयंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचले आहे. ‘खाण तशी माती’ या न्यायाने देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. कोरोना काळापासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आपला आक्रमक बाणा कायम ठेवत राऊत म्हणाले राज्यातील आमदार आणि खासदार ५०-५० कोटी रुपयांना विकत घेऊन सरकार बनवले, तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का? संविधानाच्या विरोधात जाऊन निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष आणि ज्यांना धड मराठी येत नाही असे अध्यक्ष असणे, ही राज्याची बदनामी नाही का? राज्यात रोज खून, हत्या आणि बलात्कार होत आहेत, याने राज्याची प्रतिमा मलिन होत नाही का?

शेवटी, आणीबाणी सदृश परिस्थिती उधळून लावली जाईल, असा इशारा देत राऊतांनी सुनावले, “इथे नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदर सारखे जगज्जेते टिकू शकले नाहीत, तर हे काय टिकणार? आरएसएसचा इतिहास त्यांनी समजून घ्यावा, मी त्यांना पुस्तक पाठवतो. महाराष्ट्राची जनता ही केवळ वाघ आहे, हे या सुलतानांनी लक्षात ठेवावे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ