‘मिसिंग लिंक’ दुर्घटनेवरून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी; कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सुळेंनी घेरले.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीच्या चर्चांना उधाण आले आहे. काही काळापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा वावड्या उठल्या होत्या, ज्याला काँग्रेस नेत्यांनीही हवा दिली होती. मात्र, आता त्या चर्चा शांत होताच एका नव्याच राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांचा गट थेट सत्ताधारी महायुतीत सामील होणार असून, ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात या संदर्भात गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांना आपल्या नेहमीच्या मिश्किल आणि खुमासदार शैलीत उत्तर देत विरोधकांचे पुरते अवसान घालवले.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी या कथित बैठकांचे रहस्य उलगडले. त्या म्हणाल्या, “विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात कोणती बैठक झाली की नाही, याची मला कल्पना नाही. पण आम्ही एकाच कमिटीमध्ये एकत्र काम करत असल्याने आमचे सतत भेटणे होते. गेल्या महिनाभरात मी स्वतः विनोदजींना तब्बल २१ वेळा भेटले आहे आणि या बैठकांमध्ये भाजपचे अध्यक्ष आणि इतर अनेक बडे नेतेही उपस्थित होते.” राष्ट्रवादी पक्ष भविष्यात सत्तेत सहभागी होणार का, या थेट प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आमचे मुख्य ध्येय सामान्य जनतेची सेवा करणे हेच आहे. गेल्या १२ वर्षांपासून आमच्या पक्षाबद्दल सातत्याने वावड्या उठवल्या जात आहेत. पण सध्या ज्या पद्धतीचा कारभार राज्यात सुरू आहे, तो पाहता भविष्यात आम्हाला लढावेच लागेल आणि सत्ता हस्तगत करावीच लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
याच पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर अत्यंत गंभीर आणि तीक्ष्ण शब्दांत प्रहार केला. मंदिरातून पैसे आणि चांदी काढतानाचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. देशातील जनतेने आपल्या कष्टाच्या पैशातून आणि संघर्षातून हे मंदिर उभे केले आहे. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्याच दरबारात जर असा भ्रष्टाचार होत असेल, तर यावर काय बोलणार, असा सवाल त्यांनी केला. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर भाजपने नेहमी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना आता प्रभू श्रीरामालाही न सोडल्याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
राज्यातील स्थानिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. राज्यातील शेतकरी कर्जमाफी ही पूर्णपणे फसवी असून, मातीशी प्रामाणिक राहणाऱ्या बळीराजाचे कंबरडे मोडण्याचे पाप हे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात झालेल्या मोठ्या दुर्घटनेवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने चौकशीची मागणी केली. अत्यंत गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला हा मार्ग पहिल्याच पावसाळ्यात १८ तास बंद राहिला आणि त्यावर दरड कोसळली. या निष्कृष्ट दर्जाच्या कामासाठी संबंधित ठेकेदारांना आणि सरकारला उत्तर द्यावेच लागेल, असे म्हणत त्यांनी सरकारची कोंडी केली.




