महायुतीचं महानगरपालिका निवडणुकीत जबरदस्त बहुमत येणारठाणे आणि मुंबईत राजकीय तापमान वाढलंय! शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार’ असं विधान करून वादग्रस्त वातावरण निर्माण केलं, त्यावर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) (शिंदे गट) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राऊतांना थेट चॅलेंज देत देसाई म्हणाले, “तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या आणि भांडुप महानगरपालिकेच्या वॉर्डातून २०२६ च्या पालिका निवडणुकीत उतरून दाखवा. मगच आमच्या ‘ठिकऱ्या’ उडवण्याचा विचार करा!” आम्ही तर जनतेच्या विश्वासाने निवडून आलोय, राज्यसभेत ‘बॅकडोर’ एंट्रीसारखं काही नाही आमच्याकडे, असंही त्यांनी उपरोधिकपणे सांगितलं.देसाई यांनी राऊतांच्या ठाणे मोर्च्यावरही हल्लाबोल केला. “तो मोर्चा फक्त ४०० लोकांनी भरला होता आणि तेही बाहेरून आणलेले!
ठाणेकरांना राऊत कोण आहेत हे चांगलंच माहीत आहे. आता महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला सध्याच्या बहुमतापेक्षा जास्तच मिळेल, हे ठाणेकर जनता दाखवून देईल,” असं ते म्हणाले. इतकंच नव्हे, तर २०२२ च्या शिंदे सरकारच्या काळात राऊतांनी ‘मुंबईत येऊन दाखवा’ असं आव्हान दिलं होतं, त्यावर आम्ही वरळीतून वाजत-गाजत फिरलो आणि काय झालं? राऊतांची बोलणी फक्त हवेत उडतात, त्यातलं अर्धं वाक्यही खरं ठरलं तरच आम्ही ऐकू, असं देसाईंनी कटाक्ष केला. दुसरीकडे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘९६ लाख खोटे मतदार’ या आरोपावरही देसाईंनी शंका उपस्थित केली. “जर एवढे खोटे मतदार असतील तर पुरावा द्या! हरकती घेण्याची मुदत संपलीय आता. मनसेकडे काही माहिती असेल तर निवडणूक आयोगाकडे जमा करा. आयोगाने जिल्हा प्रशासनांकडून अहवाल मागितले आहेत आणि चुकीचं सिद्ध झालं तर कारवाई होईलच,” असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे गटाच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा ठाणे-मुंबईत चुरस वाढली असून, २०२६ च्या पालिका लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ठाणेकर जनता काय म्हणते, हे निवडणुकीतच कळेल!




