ओतूर, प्रतिनिधी:रमेश तांबे
जुन्नर तालुक्यातील ओतूर गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि स्थानिक राजकीय मतभेदांमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गावातील कचरा उचलण्याचे काम ठप्प झाल्याने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी हा कचरा वाहनांतून खाली पडत असून, वाऱ्यामुळे प्लास्टिक आणि इतर घनकचरा रस्त्यांवर विखुरला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील नागरिकांना दररोज या परिस्थितीचा सामना करावा लागत असून, आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्वच्छता आणि हरित गावाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते, मात्र त्याचे परिणाम नागरिकांना दिसत नसल्याची टीका होत आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे मोकाट कुत्रे आणि जनावरांची संख्या वाढली असून, काही ठिकाणी कचरा जाळला जात असल्याने धूर आणि प्रदूषणाचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, कचऱ्यापासून खत आणि बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी विविध शासकीय स्तरांवर पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी मिळवल्याचे सांगितले जाते. यासाठी मुंजेवाडी परिसरात जमीनही निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रकल्पासाठी जाणारा रस्ता स्थानिक नागरिकांनी रोखल्याने या योजनेची अंमलबजावणी पुन्हा रखडल्याची चर्चा आहे. अनेक ग्रामसभा, बैठका आणि आश्वासने दिल्यानंतरही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वाविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.




