१९७५ मधील मोठ्या अपयशानंतर लेकाच्या आगमनाने बदलले बिग बींचे नशीब; बॉक्स ऑफिसवर लागली ब्लॉकबस्टर चित्रपटांची रांग
बॉलिवूडचे शेनशहा अमिताभ बच्चन यांना आज चित्रपटसृष्टीचे ‘महानायक’ म्हटले जाते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस आणि सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, त्यांच्या या झगमगत्या प्रवासात एक काळ असाही आला होता, जेव्हा त्यांच्या स्टारडमवर आणि लोकप्रियतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण या कठीण काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत रंजक व भावनिक वळण आले. एका मोठ्या चित्रपटाच्या अपयशानंतर अवघ्या चार महिन्यांनी त्यांच्या घरी मुलगा अभिषेक बच्चनचा जन्म झाला आणि या बालकाच्या पायगुणाने अमिताभ यांच्या घसरलेल्या करिअरला अशी काही गती मिळाली की त्यांनी थेट यशाचे शिखर गाठले.
वर्ष १९७५ हे अमिताभ बच्चन यांच्यासाठी चढ-उतारांचे ठरले. याच वर्षी रिलीज झालेल्या ‘दीवार’, ‘शोले’ आणि ‘चुपके चुपके’ यांसारख्या अजरामर चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीतील सर्वोच्च स्थानी पोहोचवले होते. परंतु, याच सुवर्णकाळात ११ नोव्हेंबर १९७५ रोजी आलेला त्यांचा ‘फरार’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे कोसळला. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आकर्षित करण्यात अपयशी ठरला आणि अमिताभ यांच्या कारकिर्दीतील एक सर्वात मोठा ‘डिझास्टर’ (महाफ्लॉप) चित्रपट म्हणून याची नोंद झाली. या अपयशामुळे अमिताभ यांच्या पुढील प्रवासाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
परंतु, बच्चन कुटुंबाच्या नशिबात काहीतरी वेगळाच आणि सुवर्णयोग लिहिला होता. ५ फेब्रुवारी १९७६ रोजी अमिताभ आणि जया बच्चन यांच्या आयुष्यात दुहेरी आनंद आला; त्यांच्या घरी चिमुल्या अभिषेक बच्चनचे आगमन झाले. या आनंदापाठोपाठ अमिताभ यांच्या व्यावसायिक आयुष्यानेही मोठी भरारी घेतली. अभिषेकच्या जन्मानंतर अवघ्या काही आठवड्यांतच, २७ फेब्रुवारी १९७६ रोजी यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट पडद्यावर आला. या मल्टीस्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत प्रचंड यश मिळवले. ‘कभी कभी’ नंतर आलेल्या ‘हेरा फेरी’, ‘दो अनजाने’ आणि ‘अदालत’ या तिन्ही चित्रपटांनी कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले.
हा यशाचा रथ इथेच थांबला नाही. पुढील काळात म्हणजेच १९७७ मध्ये ‘अमर अकबर अँथनी’, ‘परवरिश’ आणि ‘खून पसीना’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आले. त्यानंतर १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘कसमे वादे’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस हलवून सोडले. या अभूतपूर्व यशाने अमिताभ बच्चन यांना ‘सुपरस्टार’ या पदवीवरून थेट भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘मेगास्टार’ बनवले. एका फ्लॉप चित्रपटानंतर लेकाच्या आगमनाने अमिताभ यांचे नशीब कसे पालटले, हा बॉलिवूडच्या इतिहासातील एक अत्यंत सुंदर आणि चमत्कारिक योगायोग मानला जातो.




