“काही लोक माझा पाठलाग करत आहेत”; राज ठाकरेंकडे मदत मागितल्यानंतर प्रसादने घेतली संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट.
मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीमध्ये जैन साध्वी आणि धर्मगुरूंसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या ऑईल पेंटच्या पट्टीचा वाद आता मोठ्या राजकीय वळणावर येऊन पोहोचला आहे. हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आणणारा प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लूएंसर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठक याने आता थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यालयात धाव घेतली आहे. “गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद लोक माझा पाठलाग करत असून माझ्या जीवाला गंभीर धोका आहे, प्लीज माझी मदत करा,” अशी आर्त हाक प्रसादने सोशल मीडिया पोस्टद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई पोलिसांना दिली होती. या पार्श्वभूमीवर आज प्रसादने मनसेचे बडे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची भेट घेऊन आपबिती मांडली.
या संपूर्ण वादाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली, जेव्हा प्रसाद वेदपाठकने त्याच्या राहत्या सोसायटीच्या सामायिक आवारात, इतर सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी न घेता एका जैन धर्मीय कुटुंबाने मारलेल्या पांढऱ्या पट्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. जैन साधू अनवाणी चालत असल्याने उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हा पट्टा मारल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र यामुळे रहिवाशांच्या भावना दुखावल्या गेल्याचे प्रसादने म्हटले होते. प्रसादच्या या व्हिडीओला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरल्यानंतर त्या पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम करून त्या हटवण्यात आल्या. यानंतर प्रसादचे इन्स्टाग्राम अकाउंटही सस्पेंड करण्यात आले, ज्यामुळे वाद आणखी पेटला.
मनसे नेत्यांच्या भेटीनंतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसे पक्ष अधिकृतपणे प्रसाद वेदपाठकच्या भूमिकेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यापूर्वीच, “अशा पांढऱ्या पट्ट्या मारून मुंबईत ‘सांस्कृतिक दहशतवाद’ पसरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा दिला होता. आता हा वाद केवळ एका सोसायटीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मुंबईत मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि स्थानिक विरुद्ध इतर असा रंग घेताना दिसतोय. मनसेच्या थेट एन्ट्रीमुळे आता हे प्रकरण येत्या काळात शांत होणार की आणखी चिघळणार, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.




