मतदार यादीत फेरफार करून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत असल्याचा मनसे प्रमुखांचा आरोप
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणूक आयोगावर खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवण्यात आले आहेत. 1 जुलैला मतदार यादी बंद झाल्यानंतरही मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे यासह विविध शहरांमध्ये सुमारे 8 ते 8.5 लाख खोटी मतदार नोंदणी झाल्याची माहिती त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.राज ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी पक्ष मतदार यादीतच गैरप्रकार करून निवडणुकीचे गणित जुळवत आहेत. “माझ्या सभांना गर्दी होते, पण मते मिळत नाहीत, असे सत्ताधारी म्हणतात. पण जर मतदार यादीतच बोगस नावे घुसवली जात असतील, तर आमचे उमेदवार कसे निवडून येतील?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “सामान्य मतदारांचे मतदान निरर्थक ठरत आहे. आम्ही निवडणूक आयोगावर टीका करतो तेव्हा सत्ताधारी चिडतात, कारण त्यांना सत्याचा राग येतो. सत्तेचा खेळ कसा चालतो, हे गल्लीबोळात सर्वांना माहीत आहे.”यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 232 जागांचे प्रचंड यश मिळाले, पण राज्यात विजयोत्सव किंवा मिरवणुका दिसल्या नाहीत. मतदार आणि निवडून आलेले उमेदवारही निकालांमुळे चकित झाले. राज ठाकरे यांनी आरोप केला की, बोगस मतदारांच्या माध्यमातून सत्ताधारी स्थानिक पक्षांना हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान देत म्हटले, “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा!”




