spot_img

Rajan Patil : अजित पवार गटाला धक्का! राजन पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला रामराम

spot_img

बेशिस्तपणा आणि निष्ठेच्या अभावामुळे नाराज राजन पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी

मोहोळचे माजी आमदार आणि सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष राजन पाटील (Rajan Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) जोरदार धक्का देत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात वाढलेला बेशिस्तपणा आणि निष्ठेला मिळणारी कमी किंमत यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी आता भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या पाटील यांनी अजित पवार गटाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.पाटील म्हणाले, “अजित दादा हे शिस्तप्रिय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शिस्तीमुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पण आता पक्षात बेशिस्तपणा वाढला आहे. जिथे शिस्त नाही, तिथे निष्ठेला किंमत नाही. भाजपमध्ये मात्र निष्ठेला मान आहे.” पक्षात निष्ठेची कमतरता जाणवल्याने आपण पक्षापासून अलिप्त झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरही खोचक टीका केली. “मी छोट्या माणसांबद्दल बोलत नाही,” असे म्हणत त्यांनी उमेश पाटलांवर निशाणा साधला.

राजन पाटील यांनी माजी आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांच्यासह इतरही सहकारी आपल्या निर्णयाशी सहमत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “यशवंत माने हे निष्ठावंत आहेत आणि तेही माझ्यासोबत भाजपमध्ये येतील.” दरम्यान, भाजपमध्ये प्रवेशाचा मुहूर्त कधी, असा प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे उत्तर दिले, “मुहूर्त शोधायला हे काय लग्न आहे का?”पाटील यांनी यावेळी एक आव्हानही दिले. “मी कायमचा आमदार नाही, माझ्याकडे कारखाने किंवा पैसा नाही, पण माझ्यात हिंमत आहे. मोहोळ तालुक्याला दहशतमुक्त करण्यासाठी मी लढलो आहे. माझ्याविरोधात कोणी लढायची हिंमत दाखवावी. जर मी हरलो, तर राजकारण सोडेन,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.या घडामोडींमुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून, राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ