Crime News : अपघाताचा बनाव रचून पत्नीनेच मेहुण्याच्या मदतीने केला अभियंता पतीचा खून; १२ तासांत पोलिसांकडून गुन्ह्याचा धक्कादायक उलगडा

spot_img

महिनाभरापासून रचला कट, कारने ३ वेळा चिरडून घेतली घेतली धाव; कौटुंबिक वादातून सुपारी देऊन जलसंधारण अभियंत्याची हत्या

कराड शहरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका कथित अपघातामागे अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित खुनाचा कट असल्याचे कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणले आहे. मृदू व जलसंधारण विभागात कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले (अभियंता, रा. मनव, ता. कराड) या अधिकाऱ्याची त्यांच्याच पत्नीने स्वतःच्या भावाच्या मदतीने कारने चिरडून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कराड पोलिसांनी तत्परता दाखवत मृत अभियंत्याची पत्नी सुरेखा मंडले (वय ३६) आणि मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी पहाटे ५:५३ वाजण्याच्या सुमारास कराडमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोर एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाला मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या लक्ष्मण मंडले यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्नी सुरेखा हिने हा केवळ एक रस्ते अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिच्या बोलण्यातील विसंगती आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना तात्काळ संशय आला.

पोलीस उपअधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, पोलिसांच्याही अंगावर काटा आला. फुटेजमध्ये लक्ष्मण मंडले हे कमल हॉस्पिटलसमोरून पायी जात असताना एका भरधाव अल्टो कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी कार पुढे-मागे करून त्यांना निर्घृणपणे चिरडले आणि त्यांच्या जवळील बॅग व साहित्य घेऊन पळ काढला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही वेळाने आरोपी पुन्हा त्याच कारसह घटनास्थळी आले आणि रस्त्यावर जखमी अवस्थेत तडफडत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर पुन्हा कार घालून त्यांचा जीव घेतला.

मृदू व जलसंधारण विभागात शहापूर (जि. ठाणे) येथे कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले यांचे महाबळेश्वर आणि कराड भागात मोठे काम होते. कौटुंबिक वादाचा राग मनात धरून पत्नी सुरेखा हिने महिनाभरापूर्वीच पतीचा काटा काढण्याचे नियोजन केले होते. पतीच्या प्रत्येक हालचालीवर आणि लोकेशनवर लक्ष ठेवून तिने भाऊ संग्राम याच्या मदतीने ओळखीच्या काही गुन्हेगारांना पतीची हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. अपघाताचा बनाव रचून ही हत्या करण्यात आली असली, तरी पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेल्या बहीण-भावाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात सुपारी घेऊन प्रत्यक्ष कार चालवणाऱ्या व गुन्ह्यात मदत करणाऱ्या इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी कराड शहर पोलिसांची ३ पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) २ पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ