पाकिस्तान-चीनच्या जवळीकीमुळे आधीच संबंध बिघडले असताना नव्या घटनेने खळबळ; कूचबिहारच्या भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा कडक
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कटुता पाहायला मिळत आहे. गंगा नदीच्या करारावरून आणि बांगलादेशची पाकिस्तान-चीनसोबत वाढती जवळीक यामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता ‘अवैध स्थलांतरितांच्या’ मुद्द्यावरून सीमेवर मोठा लष्करी तणाव निर्माण झाला आहे. त्यातच पश्चिम बंगालच्या कूचबिहार सीमेवरील ‘झिरो पॉईंट’वरून तब्बल ४० बांगलादेशी नागरिक अचानक गूढरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून संपूर्ण सीमेवर खळबळ उडाली आहे.
कूचबिहार जिल्ह्यातील मेखलीगंज भागातील पानिशाला परिसरात, पिलर क्रमांक १३४ जवळ सर्वात जास्त तणाव पाहायला मिळाला. येथे सीमेवरील झिरो पॉईंटवर सुरुवातीला १० बांगलादेशी नागरिक अडकले होते. भारताकडून त्यांना बेकायदेशीरपणे बांगलादेशात घुसवायचा प्रयत्न होत असल्याचा दावा ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ने (BGB) केला आणि त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. यावरून शनिवारी पहाटे बीएसएफ (BSF) आणि बीजीबीच्या जवानांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. तणाव वाढल्याने सीमा सुरक्षा दलाने (BSF) हा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यासाठी ‘फ्लॅग मीटिंग’ (ध्वज बैठक) घेण्याचा प्रस्ताव बांगलादेशला दिला होता. मात्र, उद्धट भूमिका घेत बांगलादेशने हा प्रस्तावही फेटाळून लावला. केवळ पानिशालाच नाही, तर कूचबिहारमधील शितलकुची, जलपाईगुडी आणि दिनहाटा या भागातही परिस्थिती गंभीर बनली होती. या सीमावर्ती भागात महिला आणि लहान मुलांसह आणखी ३० बांगलादेशी नागरिक शुक्रवारी रात्रीपर्यंत अडकून पडले होते.
या संपूर्ण नाट्यात सर्वात मोठा धक्का शनिवारी सकाळी बसला. शुक्रवारी रात्रीपर्यंत सीमेवर अडकलेले हे एकूण ४० नागरिक शनिवारी पहाटे अचानक गायब झाले. बांगलादेश तर त्यांना आपल्या देशात घेण्यास सक्त नकार देत होता, अशा परिस्थितीत हे ४० जण नक्की कुठे गेले? ते परत बांगलादेशातील आपल्या हद्दीत गेले की भारतीय सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून भारतातच कुठेतरी गुप्तपणे घुसले? यावरून आता मोठी शंका उपस्थित केली जात असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
सध्या आसाम आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी परत पाठवण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र, बांगलादेश सरकार आपल्याच नागरिकांना परत स्वीकारण्यास नकार देत असल्याने सीमेवर दररोज संघर्ष पाहायला मिळत आहे.
४० बांगलादेशी नागरिकांचे अशा प्रकारे अचानक बेपत्ता होणे ही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे बीएसएफने सीमेवरील गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. दोन्ही देशांमधील हा सीमावाद येत्या काळात आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




