कायदेशीर तरतुदींचा गैरवापर केल्याने टीव्ही इंडस्ट्रीतून तीव्र संताप; पूजा बेदी आणि करण ओबेरॉय यांनीही डागली तोफ
‘भाभीजी घर पर हैं’ फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने जवळपास १० वर्षांनंतर एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. २०१६ मध्ये मालिका सोडताना तिने निर्माते संजय कोहली यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप पूर्णपणे खोटे होते, अशी कबुली तिने कॉमेडियन भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये दिली आहे. केवळ कराराच्या वादातून आणि मालिकेतून बाहेर पडण्यासाठी कोणताही पर्याय उरला नसल्याने आपण हे खोटे आरोप केले होते, असे शिल्पाने मान्य केले. तिच्या या खळबळजनक विधानानंतर सोशल मीडिया आणि टीव्ही इंडस्ट्रीत तिच्यावर प्रचंड टीका होत असून, प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने यावर अत्यंत कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मोठी पोस्ट लिहीत शिल्पाच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला. हिना म्हणाली, “एखाद्या वादात स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आणि जिंकण्यासाठी स्वतःच्या स्त्रीत्वाचा वापर करून दुसऱ्याच्या प्रतिमेला काळीमा फासणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. या प्रकरणात खरी पीडित व्यक्ती तो पुरुष (निर्माता) आहे, ज्याला पत्नी, मुलगी आणि कुटुंब आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा असा गैरवापर करणाऱ्या लोकांना आपण वेळीच रोखायला हवे.” हिनाने पुढे स्पष्ट केले की, खऱ्या पीडितांना न्याय मिळायलाच हवा, पण अशा खोट्या आरोमांमुळे खऱ्या पीडितांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. धक्कादायक म्हणजे, ज्या निर्मात्यावर खोटे आरोप केले, त्याच निर्मात्याने शिल्पाला पुन्हा मालिकेत काम दिल्याने हिनाने यावर ‘हा आपल्या सर्वांचाच एक विनोद झाला आहे’ असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले.
फक्त हिना खानच नाही, तर टीव्ही इंडस्ट्रीतील इतर ज्येष्ठ कलाकारांनीही शिल्पा शिंदेच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी जाहीर केली आहे. अभिनेत्री पूजा बेदीने यावर स्पष्ट मत मांडले की, “पीडितांच्या संरक्षणासाठी बनवलेल्या कायद्यांचा वापर जेव्हा अशा प्रकारे वैयक्तिक सुडासाठी किंवा फायद्यासाठी केला जातो, तेव्हा तो त्या मूळ उद्देशालाच हरताळ फासतो. अशा खोट्या आरोपांमुळे innocent (निष्पाप) लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि खऱ्या पीडितांवर कुणी विश्वास ठेवत नाही.” तर दुसरीकडे, अभिनेता करण ओबेरॉयने अशा संवेदनशील कायद्यांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या वादामुळे आता टीव्ही जगतात कायदेशीर कलमांच्या गैरवापराबाबत एक नवी चर्चा सुरू झाली आहे.




