मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग होत असताना आता ‘घबाडकुंड’ हा रहस्य, भय आणि थराराने परिपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली असून त्यातील गूढ वातावरण, थरारक प्रसंग आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निर्माते डॉ. रसिक कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असल्याचा दावा करणारा हा चित्रपट 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची कथा एका गूढ आणि रहस्यमय ठिकाणाभोवती फिरते. एका रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण धोकादायक मोहिमेवर निघतात. मात्र या प्रवासात त्यांच्यासमोर अशा काही अनाकलनीय आणि भयावह घटना घडतात, ज्यामुळे त्यांची परीक्षा सुरू होते. ‘घबाडकुंड’मध्ये नेमके कोणते रहस्य दडले आहे आणि त्यामागील सत्य काय आहे, याची उत्कंठा संपूर्ण कथानकभर कायम राहते.
रहस्य आणि थरार यांची प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे आणि साहिल अनलदेवर यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
रहस्यमय कथा, अंगावर शहारे आणणारा थरार आणि मोठ्या पडद्यावर अनुभवता येणारे अनोखे सिनेमॅटिक विश्व यामुळे ‘घबाडकुंड’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगत आहे. 19 जूनपासून हा थरारमय प्रवास चित्रपटगृहांमध्ये अनुभवता येणार आहे.




