सोशल मीडियावर अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल चळवळीबाबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना तिने कोणताही ट्रेंड आंधळेपणाने फॉलो करण्याऐवजी स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करून मत मांडणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
युवकांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सुरू झालेल्या या ऑनलाइन मोहिमेची देशभरात चर्चा सुरू असताना अंकिताने या विषयावर संतुलित भूमिका घेतली. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा आवाज आणि विचार मांडण्याची ताकद असते. अन्यायाविरोधात बोलण्यासाठी नेहमी कोणाच्या तरी नेतृत्वाची गरज नसते, असे मत तिने व्यक्त केले.
कॉकरोच जनता पार्टीबाबत आपण नुकतेच ऐकले असून या चळवळीविषयी फारशी माहिती नसल्याचेही तिने स्पष्ट केले. त्यामुळे या विषयात खोलवर सहभागी होण्याचा किंवा कोणत्याही गटाशी स्वतःला जोडण्याचा विचार नसल्याचे ती म्हणाली. आपल्याकडे स्वतःचा व्यासपीठ आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य असल्याने आवश्यक वाटल्यास आपण थेट सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो, असेही तिने नमूद केले.
अंकिताने पुढे सांगितले की, समाजातील किंवा व्यवस्थेतील कोणत्याही चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवताना स्वतंत्र विचारसरणी जपणे गरजेचे आहे. केवळ सोशल मीडियावर एखादी गोष्ट लोकप्रिय होत आहे म्हणून त्यामागे जाण्यापेक्षा तथ्य आणि परिस्थिती समजून घेऊन भूमिका घेणे अधिक योग्य असल्याचे तिने सांगितले. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावरील ट्रेंड, युवकांचा सहभाग आणि वैयक्तिक मतस्वातंत्र्य याविषयी पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.




