Dhananjay Deshmukh : बीडमधील पिस्तूल रोखून धमकी दिल्याचा ‘तो’ खळबळजनक आरोप खोटा; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा, दोन्ही बाजूंवर कारवाईचा इशारा!

spot_img

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावरील गुन्हा चौकशीत ठरला बनावट; सीसीटीव्ही (CCTV) फुटेजवरून सत्य आले समोर.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मज्जासोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. समाधान खिंडकर नामक व्यक्तीने धनंजय देशमुख यांच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि तांत्रिक तपासात घटनास्थळी असा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तक्रारदार समाधान खिंडकर याने आरोप केला होता की, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिली होती. धनंजय देशमुख हे बीडमधील बहुचर्चित आणि देशभर गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मृताचे भाऊ असल्याने या आरोपाने जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली होती. (संतोष देशमुख हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे). खिंडकर याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता, मात्र सत्य शोधण्यासाठी पोलिसांनी सकाळपासूनच घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

पोलीस प्रशासनाने हॉटेल परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची अत्यंत कसून तपासणी केली आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. या पडताळणीत खिंडकर याने केलेला पिस्तूल रोखल्याचा आणि धमकीचा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दुसरीकडे, या वादानंतर धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर यानेच आपल्याला धमकावल्याची उलट तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात जाणीवपूर्वक खोटी तक्रार दिल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना धनंजय देशमुख यांनी प्रशासकीय घाईबदलावर प्रश्न उपस्थित केले. “मी पोलिसांना रात्रीच प्रकरणाची शहानिशा करून पुढील पाऊल उचलण्याची विनंती केली होती, मात्र पोलिसांनी पहाटेच गडबडीत गुन्हा दाखल केला. आता तपासाअंती हे सर्व आरोप खोटे आणि बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे,” असे देशमुख म्हणाले. बीड पोलिसांनी या खोट्या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाचा सविस्तर अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. तसेच समाजात अफवा पसरवणाऱ्या आणि पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या दोन्ही खोट्या तक्रारदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ