IPL 2026 : “यशस्वी जयस्वालने राजस्थान रॉयल्स सोडावी!” अंबाती रायुडूचा खळबळजनक सल्ला

spot_img

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या झंझावातामुळे जयस्वालचे यश झाकले जात असल्याचा रायुडूचा दावा

आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारत राजस्थान रॉयल्सने (RR) क्वॉलिफायर २ फेरीत दिमाखात धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना क्वॉलिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. संघ विजेतेपदाच्या शर्यतीत असतानाच राजस्थानचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने यशस्वी जयस्वालला चक्क ‘राजस्थान रॉयल्स’ संघ सोडण्याचा खळबळजनक सल्ला दिला आहे.

या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी कमालीच्या फॉर्मात असून त्याच्या तुफानी कामगिरीची जगभर चर्चा होत आहे. रायुडूच्या मते, वैभव सूर्यवंशीच्या या झंझावातामुळे यशस्वी जयस्वालसारख्या स्टार खेळाडूचे यश झाकले जात आहे आणि त्याला योग्य ते ‘लाईमलाईट’ मिळत नाहीये.

नुकत्याच झालेल्या एलिमिनेटर सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावांची वादळी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. याउलट, याच सामन्यात यशस्वी जयस्वालने २९ चेंडू खेळून केवळ २९ धावा केल्या. यशस्वीने या संपूर्ण हंगामात काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली असली, तरी वैभवच्या आक्रमक खेळापुढे त्याची खेळी फिकी पडताना दिसत आहे. गेल्या हंगामात यशस्वीला मिळालेली सर्व प्रसिद्धी आता वैभवकडे वळली आहे.

‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या एका कार्यक्रमात बोलताना अंबाती रायुडूने यशस्वीच्या भविष्याबाबत अत्यंत स्पष्ट मत मांडले. रायुडू म्हणाला “यशस्वी जयस्वाल हा स्वतः एक प्रस्थापित स्टार फलंदाज आहे. त्याच्यात स्वबळावर सामना जिंकवून देण्याची अफाट क्षमता आहे. मात्र, वैभव ज्या पद्धतीने खेळत आहे, त्या वातावरणात यशस्वी मुक्तपणे खेळू शकत नाहीये. प्रत्येक वेळी वैभवच्या कामगिरीमुळे जयस्वालचे प्रयत्न दुर्लक्षित राहतील. त्यामुळे यशस्वीने आता राजस्थान रॉयल्स सोडून अशा संघात जावे, जिथे त्याला मुख्य ‘स्टार फलंदाज’ म्हणून दर्जा मिळेल.”

रायुडूने पुढे सुचवले की, वैभव सूर्यवंशीसोबत सलामीला खेळण्यासाठी राजस्थानला अशा अनुभवी ओपनरची गरज आहे, जो १५ वर्षांच्या मुलासोबत आक्रमकतेची स्पर्धा न करता आपला नैसर्गिक खेळ करेल. तसेच, यशस्वी जयस्वालसाठी ‘मुंबई इंडियन्स’ (MI) हा संघ सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो, असेही रायुडूने म्हटले आहे.

अंबाती रायुडूच्या या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता आगामी काळात यशस्वी जयस्वाल रायुडूच्या या सल्ल्यावर विचार करून मेगा लिलावात किंवा ट्रेडद्वारे दुसरा संघ निवडतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ