Shrikant Shinde Convoy Accident : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

spot_img

नांदेड दौऱ्यादरम्यान शिवसंवाद यात्रेत घडली घटना; गाड्यांचे मोठे नुकसान, कार्यकर्ते आणि कर्मचारी सुरक्षित

शिवसेना (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या ‘शिवसंवाद यात्रे’दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तसेच सर्व कार्यकर्ते आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांचा ताफा नांदेडहून नायगावकडे जात असताना हा अपघात झाला. ताफा मार्गस्थ होत असताना अचानक समोरून एक वाहन आले. त्याला वाचवण्याच्या नादात ताफ्यातील मागे असलेल्या चार गाड्या एकापाठोपाठ एक एकमेकांवर पाठीमागून जोरदार आदळल्या. अपघात झालेल्या या वाहनांमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आणि आरोग्य विभागाचे काही कर्मचारी प्रवास करत होते. धडक इतकी जोरात होती की गाड्यांचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. या अपघातातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वजण बालंबाल बचावले आहेत.

अपघाताच्या या संकटानंतरही खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपला दौरा थांबवला नाही. त्यांनी नियोजित वेळेनुसार नायगाव, मुखेड आणि देगलूर विधानसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बूथनिहाय नियोजन, ग्रामीण भागातील पक्षविस्तार आणि जनसंपर्क वाढवण्याबाबत त्यांनी सखोल चर्चा केली.

“शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ताकद आहे. ही ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पूर्ण क्षमतेने मैदानात उतरले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी आणि बूथ पातळीवर संघटनेची पकड मजबूत करणे यावर विशेष भर देण्यात आला. आगामी निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व आघाड्यांवरील पदाधिकाऱ्यांनी आणि शाखाप्रमुखांनी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, अशा कडक सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ