महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच राज्यातील काही पदाधिकारी आणि नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती. विशेषतः कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये मुक्कामी असल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजनांबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर पंतप्रधानांकडून मार्गदर्शन मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या बैठकीची माहिती दिली. “आमचे नेते आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या भेटीतून नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, राज्यातील सत्ताधारी नेत्यांच्या या दिल्ली दौऱ्यामागे नेमकं काय राजकारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार किंवा संघटनात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.




