मिरा रोड, घाटकोपर आणि गोरेगावात मनपाकडून कुर्बानीची परवानगी रद्द; सोसायट्यांना छावणीचे स्वरूप
मुंबई आणि उपनगरातील काही नामांकित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बकरा आणण्यावरून तसेच कुर्बानी देण्यावरून गेल्या दोन दिवसांत मोठे वाद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, आज संपूर्ण मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात बकरी ईद साजरी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीचा तणाव निवळल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मिरा रोडच्या ‘पूनम इस्टेट’ सोसायटीत काही दिवसांपूर्वी बकरा आणण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. त्यामुळे भाईंदर पोलिसांनी आज संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप दिले होते. मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, सोसायट्यांमधील अंतर्गत मतभेद प्रशासनाने वेळीच मध्यस्थी करून मिटवले आहेत. रहिवाशांनीही पोलिसांच्या या चोख सुरक्षा नियोजनाचे कौतुक केले आहे.
दुसरीकडे, घाटकोपर येथील ‘सागर पार्क’ सोसायटीमध्ये रहिवासी भागात कुर्बानी दिली जात असल्याच्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तिथे भेट देऊन तीव्र विरोध दर्शवला होता. या वादानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) ऐनवेळी बकऱ्यांची परवानगी रद्द केल्याने मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी पसरली. आज येथे कडक बंदोबस्त असून, रहिवाशांनी अधिकृत ठिकाणी कुर्बानी दिली; मात्र पालिकेच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असाच प्रकार गोरेगाव पूर्व येथील ‘सॅटेलाइट गार्डन’ या उच्चभ्रू सोसायट्यामध्ये घडला. भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनी मोकळ्या जागेत कुर्बानी देण्यास आक्षेप घेत पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर बीएमसीने तातडीने परवानगी नाकारली. या घडामोडींमुळे काल सायंकाळी तणाव निर्माण झाला होता, मात्र आज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती हाताळली. मुंबई आणि ठाणे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.




