मुंबईतील आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या APMC मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत तोंडाच्या कर्करोग पूर्वतपासणी शिबिरात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या ३८९ जणांपैकी तब्बल ७५ जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आढळले असून २१ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली APMC सचिव शरद जरे यांच्या पुढाकारातून टाटा मेमोरिअल सेंटर आणि वर्ल्ड अग्रो केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मसाला आणि फळ मार्केटमध्ये ही मोफत तपासणी मोहीम राबवण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती आणि कर्करोगाचे लवकर निदान हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मात्र एवढ्या मोठ्या धोक्याची माहिती समोर आल्यानंतरही बाजारातील कामगार, माथाडी, व्यापारी आणि इतर घटकांचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. बाजार परिसरातील पानटपऱ्यांवर गुटखा खरेदीसाठी मोठ्या रांगा दिसतात, पण आरोग्य तपासणीसाठी नागरिक पुढे येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
APMC मधील विविध मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी काही काळानंतर पुन्हा त्याच टपऱ्या सुरू होत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून तंबाखूमुक्तीसाठी कठोर आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




