‘पेट्रोलपंप बंद अन् आरसी बुक दाखवून डिझेल वाटप’; इंधन तुटवड्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात
गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी इंधनाच्या किमतींबाबत एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. राज्यात येत्या दीड महिन्यामध्ये डिझेलचे दर १५० रुपये, तर पेट्रोलचे दर तब्बल १७० रुपये प्रति लीटरवर पोहोचतील, असे भाकीत वडेट्टीवार यांनी केले आहे. “ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, तो पाहता देश आर्थिक खड्ड्यात घालण्याचे काम सुरू असून मध्यमवर्गीय माणूस यात भरडला जाणार आहे,” असा थेट हल्लाबोल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
सध्या राज्यातील अनेक भागांत केवळ महागाईच वाढलेली नाही, तर पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडाही जाणवू लागला आहे. अनेक पेट्रोलपंपांवर इंधन संपल्याचे फलक झळकत असल्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू आहे, तर शेतकऱ्यांची शेतीची कामे ठप्प झाली आहेत. या परिस्थितीवर बोट ठेवत वडेट्टीवार म्हणाले की, सरकार आणि भाजप कडून इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्यांचे आरसी बुक (RC Book) तपासून डिझेल दिले जात आहे. जर तुटवडा नाही, तर अशी सक्ती का केली जातेय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच इंधन टंचाईमुळे विमान सेवेवरही परिणाम होत असून नागपूरसह अनेक ठिकाणच्या विमान फेऱ्या रद्द होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
याच संभाषणात वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीका केली. तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, “सरकारने जरांगे पाटील यांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले आहे. जीआर काढले जातात, पण त्यांची अंमलबजावणी कधीच होत नाही.” आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ‘ओपन’ प्रवर्गातील नव्या नियमांमुळे ओबीसी आणि इतर घटकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे सांगितले. शेवटी, कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर हायकमांडचे पूर्ण लक्ष असून, सिद्धरामय्या यांचा योग्य तो सन्मान ठेवूनच नेतृत्व निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आरसी बुक पाहून ट्रॅक्टरसाठी डिझेल दिले जात असल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप आहे. महागाईसोबतच इंधन उपलब्ध न होणे हा सध्या राज्यातील सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.




