Prashant Ambi : ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरील वादाला कायदेशीर वळण; प्रशांत आंबींची कठोर कारवाईची मागणी

spot_img

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कथित शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या आरोपांप्रकरणी न्यायालयाने त्यांच्या पोलीस चौकशीला परवानगी दिली असून या निर्णयामुळे प्रकरणाला स्पष्टपणे कायदेशीर स्वरूप प्राप्त झालं आहे.

या प्रकरणात प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गायकवाडांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आंबी यांनी न्यायालयात धाव घेत न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आता चौकशीस परवानगी दिल्यानंतर गायकवाड यांच्यावरील दबाव वाढला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशांत आंबी यांनी समाधान व्यक्त करत निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करत होतो. संबंधित ऑडिओतील आवाज स्वतःचा असल्याचं गायकवाड यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आता फक्त चौकशी नव्हे, तर थेट कारवाई व्हायला हवी,” असं त्यांनी म्हटलं आहे.

यासोबतच, गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्या मिळत असल्याचाही आरोप आंबी यांनी केला आहे. यापूर्वी दोघांमधील कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पुस्तक प्रकाशित केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्या संभाषणात दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ