Ivanka Trump : इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येच्या कथित कटाचा धक्कादायक खुलासा

spot_img

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचे पडसाद आता थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. अमेरिकन तपास यंत्रणांनी केलेल्या खुलाशानुसार, ट्रम्प यांची मुलगी Ivanka Trump यांच्या हत्येचा कथित कट उघडकीस आला असून या प्रकरणामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या कटामागे इराण समर्थित दहशतवादी नेटवर्कचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी या संशयिताला तुर्कीमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला अमेरिकेत प्रत्यार्पित करण्यात आले असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. अमेरिकन तपास यंत्रणांचा दावा आहे की, संशयिताने इव्हांका ट्रम्प यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत फ्लोरिडामधील त्यांच्या निवासस्थानाची सविस्तर माहिती गोळा केली होती. इव्हांका त्यांच्या पती जेरेड कुशनर यांच्यासोबत तेथे वास्तव्यास आहेत.

या प्रकरणाचा संबंध 2020 मध्ये बगदाद येथे झालेल्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याशी जोडला जात आहे. त्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले होते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्याच घटनेचा बदला घेण्यासाठी ट्रम्प कुटुंबाला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती. या कटात आणखी काही व्यक्ती सहभागी आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून ट्रम्प कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून अमेरिका-इराण संबंध पुन्हा एकदा तणावाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ