महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडामोडी वेगाने बदलताना दिसत आहेत. पक्षांतर, गटबाजी आणि नव्या राजकीय समीकरणांमुळे राज्यातील वातावरण कायमच चर्चेत राहिले आहे. आता पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली असून ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राजकीय चर्चांना सुरुवात झाली ती ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर. या भेटीची चर्चा सुरू असतानाच खासदार वाघचैरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ठाकरे गटाचे आणखी एक खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण आणखी तापले.
या सलग भेटींमुळे ठाकरे गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा झाली होती. त्यावेळी अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले होते.
दरम्यान, भेट घेतलेल्या सर्व खासदारांनी पक्षांतराच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. राजाभाऊ वाजे यांनी “विकासकामांसाठी नेत्यांच्या भेटी होत असतात, त्याचा वेगळा अर्थ काढू नये,” असे सांगितले. तर नागेश आष्टीकर यांनीही आपण ठाकरे गटासोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
तरीदेखील, सलग सुरू असलेल्या राजकीय भेटींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्याच्या राजकीय दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.




