जे. जे. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक खुलासा; घरात ‘ते’ घातक रसायन आले कुठून? पोलिसांसमोर मोठे आव्हान
मुंबईतील पायधुनी भागात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एकाच कुटुंबातील चौघांचा झालेल्या गूढ मृत्यूने संपूर्ण शहर हादरवून सोडले होते. रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ले आणि पहाटे उलट्या-जुलाब होऊन काही तासांतच संपूर्ण डोकडिया कुटुंब संपले, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. यामुळे बिर्याणीवर कलिंगड खाणे जीवावर बेतू शकते, अशी एकच दहशत सोशल मीडिया आणि सर्वसामान्यांमध्ये पसरली होती. मात्र, आता या प्रकरणाच्या पोलीस तपासात आणि वैद्यकीय अहवालात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक ट्विस्ट समोर आला असून, या मृत्यूंमागे कोणतेही ‘फूड कॉम्बिनेशन’ नसून एक भयंकर विष कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या अंतिम वैद्यकीय आणि हिस्टोपॅथॉलॉजी (Histopathology) अहवालानुसार, कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकडिया, त्यांची पत्नी आणि दोन मुली या चौघांचाही मृत्यू ‘झिंक फॉस्फाइड’ (Zinc Phosphide) नावाच्या अत्यंत घातक रसायनामुळे म्हणजेच विषबाधेमुळे झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, फॉरेन्सिक लॅबच्या (FSL) तपासणीत केवळ मृत व्यक्तींच्या शरीरातच नव्हे, तर त्यांनी खाल्लेल्या कलिंगडावरही या झिंक फॉस्फाइडचे अंश आढळून आले आहेत. मृतदेहांचे मेंदू, यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidney) यांच्या तपासणीत एक विशिष्ट हिरवट रंग दिसून आला होता, ज्याने डॉक्टरांचा संशय बळावला आणि रासायनिक चाचणीत या विषाची पुष्टी झाली. पोलिसांना संशय आहे की, कलिंगडाची चव वाढवण्यासाठी त्यावर जे मीठ लावण्यात आले होते, त्या मिठाच्या डब्यातच हे विषारी रसायन मिसळले गेले असावे किंवा मुद्दाम मिसळले गेले असावे.
हा संपूर्ण दुर्दैवी थरार २५ एप्रिलच्या रात्री सुरू झाला. पायधुनी येथील डोकडिया कुटुंबाने रात्री १०.३० च्या सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत बिर्याणीचे जेवण केले होते. जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले (त्यांना कोणताही त्रास झाला नाही). त्यानंतर मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास कुटुंबातील चार सदस्यांनी घरात कापलेले कलिंगड खाल्ले. पहाटे ५.३० वाजता सर्वांना तीव्र उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान काही तासांच्या अंतराने चौघांनीही जीव गमावला. सगळ्यात आधी सकाळी १०.१५ वाजता लहान मुलीचा, त्यानंतर दुपारपर्यंत पत्नी व मोठ्या मुलीचा आणि शेवटी रात्री १०.३० वाजता अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला.
जे. जे. रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी डोकडिया यांच्या घराची कसून झडती घेतली, मात्र संपूर्ण घरात कुठेही ‘झिंक फॉस्फाइड’ (जे सहसा उंदीर मारण्याचे औषध म्हणून वापरले जाते) चा साठा किंवा डबा सापडलेला नाही. जर घरात हे रसायन नव्हते, तर ते घरात आले कुठून आणि कलिंगडावर किंवा मिठात कसे पोहोचले? या मुख्य प्रश्नाचा शोध आता पायधुनी पोलीस घेत असून, या प्रकरणात घातपाताचा (Murder) संशय देखील नाकारता येत नाही.




